Bhartiyans

Menu

केमिकल्सचा अतिरेक करून पिकवलेल्या भाज्या, फळे खाऊन वैतागले आहात ना? आता, तुम्हीच करा शेती, तीसुद्धा कमी जागेत, कमी खर्चात!

Date : 19 Sep 2017

Total View : 1048

बंगळूरच्या आर्य पदोताने ‘माय ऑरगेनिक फार्म’ हे सेंद्रिय शेतीची माहिती देणारं यु ट्यूबचॅनेल सुरू केलं. त्याला १३०० हून अधिक फॉलोअर्स आणि ७ ते ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


सारांश

बंगळूरच्या आर्य पदोता या विद्यार्थ्याने ‘माय ऑरगेनिक फार्म’ हे यु ट्यूब चॅनेल सुरू केलं. त्याला १३०० हून अधिक फॉलोअर्स आणि ७ ते ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्यामुळे अनेक जणांनी घराशेजारी सेंद्रिय शेती सुरू केली आहे. टमाट्याची १००० हून अधिक रोपे त्याने लोकांना भेट स्वरुपात दिली आहेत. कर्नाटक आणि तेलंगणा सरकारच्या वनविभागासाठीही आर्यने हाच उपक्रम राबवला आहे.सविस्तर बातमी

‘हल्ली पूर्वीसारख्या शुद्ध भाज्या मिळत नाहीत’... ‘सगळीकडेच भेसळ आहे हो!’... ‘हल्ली तर कारपेटमध्ये फळं पिकवतात म्हणे’.. असे संवाद अधूनमधून तुमच्या कानावर पडत असतील. आपण सगळेच अशा गप्पा मारत असतो. गप्पांपुरतं हे ठीक आहे; मात्र, केवळ तोंडून असं बोलून पुन्हा तशाच भाज्या-फळे आपण खाणार का? की फक्त गप्पा मारण्यात धन्यता मारणार?

कृत्रिमरित्या, रासायनिक खते वापरून पिकवलेली फळे, भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे ना? काहीतरी करावंस वाटतंय? शेती, बागकामाची जागा आहे; पण कोण मार्गदर्शन करेल? जागा आहे पण नक्की आपण आपल्यासाठी शुद्ध भाज्या पिकवायच्या तरी कशा?

तुमच्या अशा असंख्य प्रश्नांवर एकच उत्तर आहे. यु ट्युबवर ‘माय ऑरगेनिक फार्म’ हे चॅनेल बघा!

आर्य पदोता हा १८ वर्षांचा तरुण, ताज्या दमाचा शेतकरी तुम्हाला ऑरगेनिक फार्मिंग अर्थात सेंद्रिय शेती कशी करायची ते शिकवेल!

बंगळूरच्या इंदिरानगरमधील नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आर्य पदोता याने ‘माय ऑरगेनिक फार्म’ हे यु ट्यूब चॅनेल सुरू केलं. आज या चॅनेलचे १३०० हून अधिक फॉलोअर्स आहेत. आर्यच्या प्रत्येक व्हिडिओला ७ ते ८ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. आर्यचे व्हिडिओ पाहून अनेक जणांनी घराशेजारी किंवा मिळेल त्या छोट्या जागेत सेंद्रिय शेती सुरू केली आहे.

आर्यने त्याच्या आईकडून प्रेरणा घेऊन सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. तो म्हणतो, “२०११ सालची गोष्ट आहे. मी तेव्हा १२ वर्षांचा होतो. माझ्या आईने आमच्या घराशेजारीच ४००० चौ.फूट जागा विकत घेतली. मात्र, तिथे घर बांधण्याऐवजी किंवा एखादी इमारत उभी करण्यापेक्षा, त्या जागेत तिने शेती करायचं ठरवलं. आईने तिथे ‘किचन गार्डन’ तयार केलं. यामुळे आम्ही आमच्यासाठी भाज्या आणि काही फळे पिकवू लागलो. तिथूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.”

लहानग्या आर्यच्या मनावर हे संस्कार होत गेले. तो आईला शेती करण्यात मदत करू लागला आणि सेंद्रिय शेती कशी करायची हे शिकू लागला. दोन वर्षातच त्याला बऱ्यापैकी सगळंच जमू लागलं आणि तो एकटा त्यांच्या किचन गार्डनची देखभाल करू लागला. आर्यच्या शेजारचे आणि परिसरातले अनेक लोक त्यांच्याकडून शुद्ध भाज्या आणि फळे विकत घेऊ लागले.

आर्य आणि त्याच्या आईने मिळून तयार केलेलं किचन गार्डन पाहून अनेक लोकांनी त्यांना तसंच किचन गार्डन त्यांच्या घराच्या आवारात तयार करून देण्याची विनंती केली. आर्यने अनेक लोकांना त्यासाठी मदत केली. अनेक शाळांमध्येही त्याने ही संकल्पना राबवली. यासोबतच भाज्या आणि फळांच्या सालांपासून कंपोस्ट खत कसं करायचं, याचे धडेही तो लोकांना देऊ लागला.

आर्यची किचन गार्डनची संकल्पना लोकप्रिय होत होती. त्याचं सेंद्रिय शेतीबाबतचं संशोधनही सुरू होतं. हा उपक्रम अनेक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने यु ट्यूब चॅनेल सुरू केलं.

कर्नाटक आणि तेलंगणा राज्य सरकारच्या वनविभागाला आर्यचा उपक्रम आवडला. आर्यने त्यांच्यासोबत सेंद्रिय शेतीला उत्तेजन देणारे काही उपक्रम राबवले. २०१५ मध्ये त्याने बंगळूरमधील सुप्रसिद्ध ‘क्यूबॉन पार्क’च्या संवर्धन आणि संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमांतर्गत उपक्रम हाती घेतला. आतापर्यंत टमाट्याची १००० हून अधिक रोपे त्याने लोकांना भेट स्वरुपात दिली आहेत.       

आर्यने अलीकडेच घरातल्या घरात किंवा कमी जागेत सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक कीट तयार केलं आहे. या कीटमध्ये बिया, माती, सेंद्रिय खते यांसह आवश्यक साधने आणि माहितीपुस्तिका दिली आहे. या माहितीपुस्तिकेत दिलेली कृती वाचून कोणालाही सेंद्रिय शेती करणं शक्य होणार आहे.

भेसळयुक्त भाज्यांपासून मुक्ती आणि शेती करण्याचा अनुभव घ्यायचा घ्यायचा असेल, तर सेंद्रिय शेती नक्की करून बघा!  

-----------------------------------------------------------------------------------------------

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

टाईम्स ऑफ इंडिया