Bhartiyans

Menu

वय फक्त ९ वर्षे; पण मैदान गाजवतेय ‘अंडर-१९’ मुलींच्या संघात या ‘वंडरगर्ल’च्या रूपाने भारताला मिळू शकते ‘लेडी मास्टर-ब्लास्टर’ !

Date : 09 Nov 2017

Total View : 574

इंदौरची आनंदी तागडे ही अवघ्या ९ वर्षांची चिमुरडी ग्वाल्हेरला होत असलेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती लवकरच महिलांच्या ‘टीम इंडिया’मध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.


सारांश

आनंदी तागडे या इंदौरच्या चिमुरडीच्या रूपाने क्रिकेटविश्वाला एक ‘लेडी लिटील मास्टर’ मिळाली आहे. ती वयाच्या ९ व्या वर्षीच ग्वाल्हेरला होत असलेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाली आहे. राईट आर्म मिडीयम बॉलर असलेल्या आनंदीने वयाच्या ५ व्या वर्षापासूनच क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तिचे वडील आणि विद्यापिठास्तरीय क्रिकेट सामने खेळलेली आई तिला प्रोत्साहन देत आहे.सविस्तर बातमी

क्रिकेटचा देव.. विक्रमादित्य.. धावांचा बादशाह.. मास्टर-ब्लास्टर ही सर्व विशेषणं वापरल्यावर ती कोणासाठी आहेत, हे वेगळं सांगायला नको. अर्थातच, भारतरत्न सचिन तेंडूलकरसाठीच ! वयाच्या १५-१६व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवलेल्या या ‘वंडरबॉय’चा त्याआधीचा काळ मात्र प्रचंड मेहनतीचा, तपस्येचा आणि कष्टाचा आहे. त्याने त्याचं लहानपण केवळ ‘मजा’ करण्यात घालवलं नाही; म्हणूनच आज नियतीने त्याच्या पदरात क्रिकेटविश्वातील अढळपद बहाल केलं आहे.

कदाचित हीच संधी नियतीला इंदौरच्या एका ‘वंडरगर्ल’बद्दल पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आनंदी तागडे या इंदौरच्या अवघ्या ९ वर्षांच्या चिमुरडीच्या रूपाने क्रिकेटविश्वाला एक ‘लेडी लिटील मास्टर’ मिळाली असून ती प्रचंड उलथापालथ घडवून आणण्याची शक्यता आहे. आनंदी आताच वयाच्या ९ व्या वर्षी ग्वाल्हेरला होत असलेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाली आहे. यावरूनच तिच्या पुढील यशाची कल्पना आपण करू शकतो.    

राईट आर्म मिडीयम बॉलर असलेल्या आनंदीने वयाच्या ५ व्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तिला या खेळाची जणू गोडीच लागली होती. तेव्हा, गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांमध्ये खेळायला जाण्यासाठी ती हट्ट करायची. मात्र, ती लहान असल्याने तिला कोणी खेळू द्यायचं नाही. शेवटी, आनंदीने मोठ्या मिन्नतवारीने आणि हट्टाने तिच्या भावाला खेळण्यासाठी तयार केलं आणि ती त्याच्यासोबत क्रिकेट खेळू लागली.

आनंदी म्हणते, “गल्लीत मुलांना मनसोक्त क्रिकेट खेळताना पाहून मलाही त्यांच्यासोबत खेळावंस खूप वाटायचं; पण मी लहान असल्याने ते मला त्यांच्यात घ्यायचेच नाही. मग, मी माझ्या मोठ्या भावासोबतच खेळायची. माझे वडील अनुराग तागडे यांनी माझं क्रिकेटप्रेम हेरलं आणि मला इंदौरमधील एका क्रिकेटक्लबमध्ये घातलं. तिथे मी शास्त्रशुद्ध पद्धतीने क्रिकेट शिकू लागली.”

क्रिकेटक्लबमध्ये गेल्यावर आनंदीला सुरुवातीला खूप घाबरली. वेगाने येणारा चामड्याचा कडक बॉल रापकन आपल्याला लागेल की काय, अशी भीती तिला सतत वाटायची. मात्र, तिची ही भीती तिच्या आई-वडिलांनी दूर केली. आनंदीची आई स्वत: क्रिकेटपटू आहे. त्या लेफ्ट-आर्म स्पिनर असून विद्यापिठास्तरीय क्रिकेट सामने खेळलेल्या आहेत. त्यांनी आनंदीच्या मनातील भीती काढली आणि तिला प्राथमिक धडेही दिले.

आनंदी तिच्या संघातील सर्वात लहान खेळाडु आहे. बाकी सर्व तिच्यापेक्षा बरेच मोठे आहेत. मात्र, असं असूनही तिच्या प्रशिक्षकांनी केवळ ती लहान आहे, म्हणून तिला सरावातून सूट दिली नाही किंवा वेगळं प्रशिक्षण देखील दिलं नाही. त्यामुळे आनंदी देखील इतर खेळाडूंप्रमाणेच ‘तयार’ झाली आहे.

वयाच्या ९ व्या वर्षी आंतर-विभागीय संघात स्थान मिळवलेली आनंदी एक दिवस महिलांच्या ‘टीम इंडिया’मध्ये नक्कीच असेल आणि तो दिवस फार दूर नाही, असा विश्वास तिच्या आताच्या सरावावरून आणि निश्चयावरून वाटतोच आहे.


#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his‘ Mission 2020.

मयूर भावे

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

द बेटर इंडिया