Bhartiyans

Menu

कलाम, मी आणि कारगिल

Date : 09 Nov 2016

Total View : 492

लेखकाची कलाम यांच्याबरोबरची अविस्मारणीय भेट!


सारांश

मिलिंद वेर्लेकर यांच्या 'कारगिल' या पुस्तकाची भेट भारतरत्न अब्दुल कलाम यांना देतेवेळी जे कौतुकाचे अद्भुत , अविस्मरणीय क्षण त्यांच्या सोबत घालवता आले, त्यात कलाम यांचे भारतावरचे उत्कट प्रेम, विविध विषयांवरील प्रभुत्व आणि समोरील व्यक्तीबद्दलची आपुलकी याने मिलिंदजी भारावून गेले.सविस्तर बातमी

कलाम, मी आणि कारगिल 
#Bharatiyans

१४ मार्च २०००... माझ्या आयुष्यातला एक भन्नाट 'कलाम'मय दिवस

आठवडाभरापूर्वीच जेष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर श्री. रघुनाथ माशेलकर यांच्याशी पुण्यात एनसीएलमध्ये एक प्रसन्न भेट झाली होती.

मी लिहिलेल्या कारगिल पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती श्री. माशेलकर यांनी दिल्लीत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना दिली होती आणि ते पुस्तक वाचून अब्दुल कलाम यांनी मला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा श्री. माशेलकर यांच्याकडे प्रदर्शित केली होती.

त्याच संध्याकाळी श्री माशेलकर यांनी सांगितल्या बरहुकुम मी दिल्लीला डॉ. अब्दुल कलाम यांना फोन केला...

त्यांच्या सेक्रेटरीने फोन घेवून त्यांच्याकडे दिला.

\\"गुड इव्हिनिंग कलाम जी...
डॉक्टर माशेलकर जी के केहेनेपर मैने आपको फोन किया है ...\\" मी म्हटलं.

\\"हा...मैने कहा था...मिलिंदजी, आपको मुझे मिलना है...यह किताब लिख्रकर आपने बहोत बडा काम किया है...इसीलिये आपका अभिनंदन करना है मुझे, क्या आप कृपया देल्ही आकर मुझसे मिल सकते है? \\"

पुढच्याच आठवड्यात दिल्लीला त्यांच्या कार्यालयात भेटायचं ठरलं.

तेव्हा कलाम साहेब पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संरक्षण सल्लागार होते आणि विज्ञान भवन ऍनेक्स मध्ये त्यांचे कार्यालय होते.
दिल्लीला पोचलो...

१४ मार्च २००० उजाडला.

संध्याकाळी ६ ची भेटीची वेळ ठरली होती...

सर्व सुरक्षा सोपस्कार आटोपून त्यांच्या कार्यालयात पोचलो...

त्यांच्या श्रीयुत जॉर्ज या स्वीय सहायकांशी बोललो...
\\"डॉक्टर साहब आपका इंतजार कर रहे है.\\" तो उद्गरला.

हृदयाचे ठोके वाढल्याचे स्पष्ट जाणवत होते मला तेव्हा...

जॉर्ज ने उघडलेल्या एका भल्यामोठ्या दरवाज्यातून आत गेलो...

एका विस्तीर्ण पसरलेल्या हॉल मध्ये लांबच लांब पसरलेल्या कोचातल्या सगळ्यात शेवटच्या कोचावर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम माझेच पुस्तक वाचत बसले होते.
अजूनही तो क्षण तसाच्या तसा आठवतो आणि एका विलक्षण दैवी समाधानी जाणिवेने अंग प्रत्यंग शहारुन उठते माझे....

शक्य तितक्या लगबगीने आणि विलक्षण अदबीने त्यांच्या जवळ पोचलो आणि त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार केला...

वाकलेल्या मला हाताने उचलून त्यांनी आपल्या शेजारी बसवले...

आणि विलक्षण प्रेमाने आणि कौतुकाने मला जवळ घेवून माझी पाठ थोपटली...

कारगिलवर मी लिहिलेल्या पुस्तकासाठी मला अनेकानेक सन्मान तेव्हा मिळाले होते...
अनेक सत्कार ही झाले होते माझे तेव्हा पण अब्दुल कलाम यांनी थोपटलेली पाठ हा विलक्षण आत्मीय सन्मान होता माझा निश्चितच....

पुढचा अर्धा तास माझ्या आयुष्यातले एक अविस्मरणीय स्मरणशील्प होते....

माझ्या पुस्तकातली वाचत असताना त्यांनी स्वतः खुण केलेली पाने उघडून खूप वेळ माझ्याशी खूप गप्पा मारल्या कलाम यांनी...

खूप माहिती घेतली आणि खूप माहिती दिली सुद्धा...

\\"आपने यह किताब लिखके देशपर उपकार किया है...ऐसी मेरी भावना है...इसीलिये आपको मिलना था...\\" त्यांच्या या उद्गारांनी महत्प्रयासांनी डोळ्यात साठलेले अश्रू थोपवून ठेवले मी तेव्हा.....

२५० पानांच्या पुस्तकाची किंमत मी केवळ ५० रुपये ठेवली होती या मुद्द्यावर शेवटी बोलले ते...खूप आपुलकीने

निघताना मला सोडायला केबिनच्या दरवाज्यापर्यंत आलेल्या कलामांनी एक सल्ला दिला मला त्या पुस्तकाच्या ५० रुपये या किमतीवरून....

\\" Milindji. never ever compromise your bread & butter for your social cause, or else you will be indirectly hampering your social cause itself.\\" कलाम निघताना मला म्हणाले...

कलाम गेले...भारतासाठी चिरंतन झाले...माझ्या सारख्या लाखो युवकांना प्रेरित करून गेले...

यापुढची प्रत्येक आषाढी मला दोन कारणांसाठी लक्ष्यात राहील...

मला गिनीज मिळाल्याचा हाच तो दिवस...

आणि संपूर्ण गीता अक्षरशः शब्दशः मुखोद्गत असणाऱ्या तसेच गीतेतल्या वचनांप्रमाणेच संपूर्ण आयुष्य जगणाऱ्या या सच्च्या भारतीयाला सद्गती देणाराही आषाढी एकादशीचा हाच तो पवित्र दिवस....

स्मार्ट फोन नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्थांचे बंधन असल्याने कॅमेरा ही नेऊ न शकल्याने मला ते क्षण दुर्दैवाने छायाचित्रीत करता आले नाहीत...

पण कलामांचा तो आश्वासक स्पर्श मात्र माझ्या जेहेन मधून कधीच मिटणार नाही...
मिटूच शकत नाही...

भारतमातेवर नितांत प्रेम असणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना तो परमेश्वर सद्गती देवो हीच या आषाढी एकादशीच्या दिवशी त्या विठ्ठलाकडे मन:पूर्वक प्रार्थना...

 

मिलिंद वेर्लेकर 
** Team Bharatiyans**

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य