Bhartiyans

Menu

राजस्थानचे पिप्लंत्री गाव मुलीच्या जन्मानंतर लावते १११ झाडे : मुलीचा जन्म असा होतो साजरा

Date : 09 Nov 2016

Total View : 240

तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर तुम्ही काय करता ?


सारांश

मुलगी जन्माला आल्यास गावात आणि सभोवताली १११ झाडे लावून जन्म साजरा करणाऱ्या या गावाला आज केवळ या अनोख्या उपक्रमाने प्रसिद्धीच नाही तर हिरवेपणा, आणि आर्थिक स्थैर्य देखील मिळाले. मुलीच्या भवितव्यासाठी आर्थिक तरतूद करणारे पिप्लांत्री गावामुळे राजस्थानला गौरवच प्राप्त झालाय! या गावाचे पूर्व सरपंच श्री पासविस्तर बातमी

तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर तुम्ही काय करता ?

काही जण खुश होतात आणि पेढे, मिठाई वाटतात, काही जण निराश होतात, काही जण \\'ओके यार\\' म्हणतात अन काही जण मुलगी आहे अस आधी कळलं तर गर्भातच तिची हत्या करतात....

पण......भारतातल्या राजस्थान मधल्या या पिप्लंत्री गावातले भारतीयन्स मात्र त्यांच्या गावात कुठल्याही घरात मुलगी जन्माला आली रे आली की आनंदोत्सव साजरा करायला म्हणून १११ झाडे लावतात, 
ही झाडे एकत्रितरीत्या तहहयात जिवाभावाने जोपासतात आणि इतकंच नव्हे तर त्या मुलीच्या शिक्षणासाठी सामुदायिक सोय सुद्धा करून ठेवतात.

आज भारत तंत्रज्ञानात कितीही प्रगत असला, तरीही अद्याप काही बाबतीत अप्रगत आहे. 
अद्यापही, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, हुंडाबळी, अशा अनेक प्रथा आणि समस्या सरकार साठी आव्हाने आहेत.

राजस्थान नेहमीच आपल्या पुरुषप्रधान संस्कृती, रूढी परंपरा, हुंडाबळी, बालविवाह, इ. मुळे चर्चेत राहिला आहे.

जिथे मुलाचा जन्म हा आनंददायी आणि मुलीचा जन्म हा कुटुंबासाठी एक ओझं समजला जातो, जिच्या लग्नाची, हुंड्याची, जबाबदारी आणि ओझं नको म्हणून तिला जन्मालाच येऊ दिलं जात नाही.

अशा राजस्थान मध्ये, गेली काही वर्षं, पिप्लंत्री गावामध्ये मुलीचा जन्म १११ झाडं लावून साजरा केला जातोय.
आज पिप्लंत्री मध्ये केवळ अनेक मुली जन्माला आल्या नाहीत, तर त्याबरोबरच गावाचा कायापालट देखिल झाला आहे. 
या अनोख्या उपक्रमाचं संपूर्ण श्रेय जातं पिप्लंत्री गावाचे माजी सरपंच, श्री श्याम सुंदर पालीवाल यांना.

पिप्लंत्रीमध्येही राजस्थानच्या इतर गावांप्रमाणेच स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण अधिक होतं, कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माबाबत लोक अत्यंत उदासीन होते.

पालीवालजी यांच्या कन्येच काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झालं. आपल्या लाडक्या मुलीच्या निधनाने व्यथित झालेल्या पालीवाल यांना ही अनोखी कल्पना सुचली आणि त्यांनी या परीस्थिती मध्ये बदल करायचे ठरवले.

गावकर्यांना समजावून, त्यांना प्रोत्साहन देवून प्रत्येक घरी मुलीचा जन्म झाल्यास गावामध्ये १११ झाडे लावून तो साजरा करण्यासाठी तयार केले. इतकेच नाही, तर ज्या कारणामुळे मुलीचा जन्म नकोसा होता, ते कारण समजून घेवून त्यावर तोडगाही काढला.

गावामध्ये एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली की आता सर्व गावकरी मिळून रु. २१,००० व नवजात मुलीचे पालक रु. १०,००० असे ३१,००० रुपये त्या मुलीच्या नावे मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवतात.

या बरोबरच, मुलीचे पालक एक प्रतिज्ञापत्र करतात की ते मुलीला १८ वर्षं पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाहीत. यामुळे, केवळ त्या मुलीच्या भवितव्याची आर्थिक तरतूद केली जात नाही तर पालकांवर पण बंधन येते की त्यांनी आपल्या मुलीला सक्षम करून १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मगच तिचे लग्न करायचे.

अशा प्रकारे बाल-विवाह देखील रोखले गेले आणि मुलीच्या जन्माबद्दल असलेले औदसिन्यही कमी झाले. 
हा अत्यंत अनोखा असा उपक्रम २००६ मध्ये सुरु झाला आणि पिप्लंत्रीचा हळूहळू कायापालट झाला. गाव हिरवेगार होऊ लागले, नव्हे तर वाळवंटात ओअसिस ठरले आहे!

या गावात वर्षाला सरासरी ६० मुलींचा जन्म होतो आणि प्रत्येक मुलीच्या जन्माबरोबर १११ झाडे लावली जातात.

शीश, कडूनिंब, आंबा, आवळा, अशा अनेक प्रकारचे वृक्ष व फळझाडे आज गावात आणि आजूबाजूला दिसतात. 
झाडांना वाळवी ई. लागू नये म्हणून त्यांच्या आसपास गावकर्यांनी कोरफडीची लागवड केली आहे. आज जवळजवळ २.५ लाख इतकी कोरफडीची झाडे देखील लावली आहेत. त्यातून आज त्यांना व्यावसायिक उत्पन्न देखील मिळू लागले आहे. 
आज याच कोरफडीच्या लागवडीच्या माध्यमातून, मार्केट मध्ये कोरफड गर, जेल ई. यांची विक्री केली जाते.

मुलीच्या जन्मानिमित्त झाडे लावण्याच्या उपक्रमाने आज गावाची आर्थिक उन्नती देखील झाली आहे.

शासनाचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा उपक्रम २०१४ मध्ये सुरु झाला, परंतु, पिप्लंत्री त्याआधी कित्येक वर्षं आपल्या गावात मुलीचा जन्म साजरा करत आहे. 
अयोग्य रूढी परंपरा बदलण्यासाठी केवळ धाडस असून उपयोग नाही, तर योग्य विचार आणि त्याची सामाजिक प्रगतीशी सांगड घालता आली पाहिजे; ज्यायोगे केवळ कौटुंबिक पातळीवर हे बदल मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तन होऊ शकते, हेच श्री पालीवाल यांनी दाखवून दिले आहे.

भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीबाबत प्रत्येक भारतीय इतकाच सजग आणि इतकाच विलक्षण संवेदनशील झाला तर......

पिप्लंत्री गावच्या सर्वांचे टीम भारतयन्स तर्फे मन:पूर्वक अभिनंदन...आणि खूप खूप शुभेच्छा

मृणाल काशीकर- खडक्कर (Mrinal Kashikar Khadakkar)
टीम भारतीयन्स 
mrinal.kk@bharatiyans.com

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

मृणाल काशीकर- खडक्कर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य

द हिंदू